रेशन धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू – खा. श्री धनंजय महाडिक

0
647
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )

 

देशभरातील रेशन धान्य दुकानदारांनी संघटीत होवून, थेट नवी दिल्लीत धडक मारली आणि आपल्या विविध मागण्यांसाठी रामलिला मैदान ते जंतर मंतर असा विराट मोर्चा काढला. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी मोर्चेकर्‍यांची भेट घेवून, रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्यांना पाठींबा दर्शवत, या विषयाला संसदेत वाचा फोडू आणि रेशन धान्य दुकानदारांना न्याय मिळवून देवू अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. यावेळी संपूर्ण देशभरातून सुमारे २ लाख रेशनधान्य दुकानदार या मोर्चात सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चुलत बंधु प्रल्हाद मोदी हे स्वत: गुजरात मधील रेशन धान्य दुकानदार असून, तेही या मोर्चात सहभागी होते. कोल्हापूर जिल्हयातून सुमारे २ हजार रेशन धान्य चालक-मालक दिल्लीतील मोर्चात उपस्थित होते. भगवे फेटे आणि हलगीच्या तालावर, कोल्हापूरचे रेशन धान्य दुकानदार दिल्लीतील या विराट मोर्चात सहभागी झाल्याने लक्ष वेधून घेत होते. खासदार धनंजय महाडिक यांनी, जंतर मंतरवर मोर्चेकर्‍यांची भेट घेवून, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. देशातील सर्व नागरीकांना खाद्य सुरक्षा योजनेत सहभागी करून घ्यावे, रेशन ग्राहकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याऐवजी ग्राहकांना पूर्वीप्रमाणे अन्नधान्य द्यावे, रेशन कार्ड आधार कार्डला जोडण्याची सक्ती नसावी, रेशन दुकानातून ५ किलोच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा, रेशन कार्डधारकांना पुरेसा साखर आणि रॉकेलचा पुरवठा करता यावा, रेशन धान्य दुकानदारांच्या कमिशन मध्ये वाढ करावी, अशा अनेक मागण्या रेशन धान्य दुकानदारांनी केल्या आहेत. खासदार महाडिक यांनी, रेशन धान्य दुकानदारांच्या नेमक्या अडचणी समजून घेवून, लवकरच हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी १० खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार करून, पंतप्रधानांसह अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटून या प्रश्‍नाचे गांभीर्य पटवून देवून आणि रेशनधान्य दुकानदारांच्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करू, असे खासदार महाडिक यांनी मोर्चेकर्‍यांसमोर बोलताना सांगितले. या मोर्चात रेशन धान्य दुकानदार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पुष्कराज काका देशमुख, पी कृष्णाप्पा, विश्‍वंभर बसू, कृष्णपालसिंग त्यागी, रमजान अली, कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजेश अंबुसकर, बी एन पाटील, राधानगरीचे महेश निल्ले, गजानन हवालदार, राजू पसारे, बाळासाहेब भोसले, रवींद्र मोरे यांच्यासह देशभरातील रेशन धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.