टोकन मिळालेल्या शेतक-यांची तूर तत्काळ खरेदी करावी – पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचे निर्देश

0
1030
Google search engine
Google search engine

अमरावती-

 

तूर खरेदी केंद्रावर टोकन दिलेल्या शेतक-यांची तूर तातडीने खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तूर खरेदी प्रक्रियेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मार्केटिंग फेडरेशनचे श्री. देशमुख यांच्यासह सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी, खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. पोटे पाटील म्हणाले की, राज्यातील तुरीचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन व तुरीसाठी निश्चित किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव शेतक-यांना मिळत असल्याने ३१ मेपर्यंत टोकन दिलेल्या सर्व शेतक-यांची तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शिल्लक तूर खरेदी करण्यापूर्वी पीकपेरा, अपेक्षित उत्पन्न, यापूर्वी तूर विक्री केली असल्यास बाजार समिती, हमीपत्र आदी तपशील मिळवणे आवश्यक आहे. टोकन घेतलेली तूर खरोखर संबंधित शेतक-याची आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्या पाऊस चालू असल्याने खरेदी करण्यात येणा-या तुरीचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. तूर साठविण्यासाठी गोदामांची, तसेच बारदानांची पुरेशी तजवीज ठेवावी. तूर खरेदीची माहिती दररोज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा पणन अधिकारी यांनी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांमार्फत राज्य शासनाला सादर करणे आवश्यक आहे. तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी खर्चाची तपशीलवार माहिती सादर करावी.
फसवणूक आढळल्यास फौजदारी खटला
व्यापा-यांकडून फसवणूकीच्या हेतूने टोकन घेतल्याचे चौकशीत आढळल्यास जिल्हाधिका-यांकडून फौजदारी खटला दाखल करण्यात यावा, असेही निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले