शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट कृषी अनुदान जमा करणार – पणनमंत्री श्री सुभाष देशमुख

0
1095
Google search engine
Google search engine

ऑनलाईन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहीतीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या माहितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा असे आवाहन  पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

पणनमंत्री देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषी विषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, शेतमालाचा बाजारातील अद्ययावत भाव, प्रमाण या विषयीची माहिती तसेच शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, लागवडीखालील क्षेत्र, आधार क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील, संपर्क क्रमांक इ. माहितीचे संकलन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्तरावर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस पणन महासंघाकडे पुर्वीपासूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीच्या तपशीलात भर घातली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प कीमान आधारभुत योजने अंतर्गत कापूस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे राबविण्यात येणार असून कालांतराने इतर शेतमाल खरेदीसाठी सुद्धा राबविण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे असे यावेळी पणनमंत्र्यांनी सांगितले.