‘आपले सरकार वेबपोर्टल’ चे दावे ठरले फोल ? तीन महिन्यांपासुन तक्रारीचे निवारण नाही

0
1551

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल काहि महिन्यांपुर्वी सुरू केले. या वेबपोर्टलचा उपयोग जनतेचा आणि सरकारचा प्रभावी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून होणार असुन राज्यातील नागरीकांना त्यांच्या तक्रारीचे ऑनलाईन पध्दतीने एकाच ठिकाणी निवारण करून घेता यावे हा या प्रकल्पाचा हेतु आहे. मात्र शहरातील एका जेष्ठ नागरीकाने या पोर्टलवर तक्रार दाखल करून 3 महिन्यांचा काळ लोटला तरी अद्यापही तक्रारीचे निवराण करण्यात आले नसल्यामुळे या पोर्टलचा दावा फोल ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यातील जनतेचा थेट मंत्रालयाशी संपर्क साधणारी आपले सरकार पोर्टल ही ऑनलाइन व्यवस्था आहे. मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुहेरी संवादाचे हे माध्यम असून ‘प्रतिसाद’ देण्याच्या माध्यमातून शासन यामध्ये जनतेप्रति ‘दायित्व’ पूर्ण करते असा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पोर्टलचे नियंत्रण केले जाते. प्रतिसादाची हमी हे पोर्टलचे वैशिष्टय़ आहे. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी या संदर्भात जबाबदार आहे. या पोर्टलमुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाला मंत्रालयाचे हेलपाटे करावे लागणार नाहीत. पोर्टलद्वारे नागरिकांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्य:स्थिती जाणून घेण्याची सुविधा असल्यामुळे मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकताच भासणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र हे सगळे दावे खोटे ठरत असल्याचे दिसत आहे. शहरातील एका जेष्ठ नागरीकाने आपली तक्रार मंत्रालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे आपले सरकार पोर्टलवर 20 सप्टेंबर 2017 रोजी दाखल केली होती. त्यानंतर पोर्टलवरून सदर तक्रारीचे विभाग बदलवुन नगर विकास 2- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असे करण्यात आले. या तक्रारीचा टोकन क्रमांक Dept/SJSA/2017/2983 हा आहे. या पोर्टलवरील तक्रारीचे 21 दिवसांत निवारण होणे जरूरी आहे. मात्र शहरातील नागरीकाच्या तक्रारीला जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही तक्रार निकाली काढण्यात आलेली नाही व त्यांचा कुठलाही रीप्लाय आलेला नाही. सदर तक्रार अद्याप का निकाली काढण्यात आली नाही याबद्दल अधिक माहितीसाठी सदर नागरीकाने 2 वेळा पोर्टलच्या कॉलसेंटरवर फोन सुध्दा केला. मात्र त्यांच्याकडुन संबंधित विभागाला दोन वेळा तक्रारीची आठवण करून दिल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारीच्या निवारणासाठी अजुन किती दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न त्या नागरीकाला पडला आहे. अन्यथा आपले सरकार वेबपोर्टलचे दावे फोल ठरणार ऐवढे मात्र निश्चित.