*श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात घुसून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू पहाणार्‍या डॉ. पाटणकरांवर त्वरित कारवाई करा !*

0
1293
Google search engine
Google search engine

आज डॉ. भारत पाटणकर यांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात सोहळ्याशिवाय घुसण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत निषेधार्ह आहे. उद्या कोणत्याही ऑपरेशन थिएटरमध्ये मला हवे ते कपडे घालून जाईन, असे म्हणून ते जाऊ शकतात का ? एखाद्याला वाटते म्हणून त्याला थेट मंत्र्याच्या केबिनमध्ये जाऊ दिले जात नाही. स्वतःला विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणार्‍या पाटणकर यांना समाजात रहातांना काही नियम आहेत, त्यांचे पालन करायचे असते, एवढा साधा विचारही ‘विचारवंतां’ना (?) करता येत नाही ! मग एखाद्या मंदिरात त्या मंदिराचे जे धर्मशास्रीय आणि परंपरागत नियम आहेत, त्यांचे पालन करायला पाटणकरांना काय अडचण आहे ? कम्युनिस्ट विचारधारा असलेले देवाला न मानणारे म्हणे अंबाबाईला साकडे घालायला आले. देवाचे दर्शन घेणार्‍याची मुळात देवावर श्रद्धा हवी, गाभार्‍यात प्रवेश हवा असा अट्टाहास नको. उद्या भलेही ते गाभार्‍यात गुंडगिरी करून प्रवेश करतीलही; पण श्री अंबाबाईची कृपा संपादन करू शकणार नाहीत. पुरोगामित्वाची लागण झालेले हे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते मंदिरांत उगाच वाद निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकी वर्ष देव-धर्म न मानणार्‍या पाटणकरांना आजच श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी, तेही गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्याची काय आवश्यकता पडली ? अर्थात पाटणकरांच्या जातीयवाद पसरवणारा कावेबाजपणा आणि प्रसिद्धीच्या हव्यासासाठी केलेला स्टंटच आहे, हे करवीरवासियांच्या लक्षात आल्यावाचून रहाणार नाही. जातीय विद्वेष पसरवून समाजात फूट पाडण्याचे पाटणकरांचे षड्यंत्र सफल होऊ नये, यासाठी शासनाच्या नियंत्रणात असलेल्या देवस्थान समितीने अशा दुष्प्रवृत्तींना मंदिरांचे नियम तोडण्यापासून रोखायला हवे. शासनाने अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कठोर आणि त्वरित कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.