श्री गुरुदेवदत्त जन्मकथा

0
757
Google search engine
Google search engine

गुरुदेवदत्त म्हणजेच दत्तात्रेयाच्या अवतार चमत्कारिक असाच झाला आहे. हा अवतार म्हणजेच ब्रह्मा, विष्णु व महेश या तिघांचा एकत्र झालेला अवतार होय.

त्याबाबतची गुरुचरित्रात, अशीच कथा सांगितली जाते.

ब्रह्मदेवांनी अनादिकाळी सृष्टीची निर्मिती केली. त्यात १४ भुवने. १० दिशा, मन, धन, वचन, काळ कामक्रोध इत्यादी षड्रिपु निर्माण केले. सृष्टीची रचना करण्यासाठी मरिची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलद, ऋतु, वशिष्ठ असे सात मानसपुत्रही निर्माण केले.

या सात मानसपुत्रांपैकी ’अत्रि’ ऋषींकडे दत्तात्रय गुरु यांचा अवतार झाला. अनसूया ही अत्रिऋषींची भार्या म्हणजेच पत्नी होती. ती महापतीव्रता व साध्वी स्त्री होती. तशीच ती दिसण्यात अप्रतिम व सुंदर होती. तिची निस्सीम पतिभक्ती पाहून सर्व देवांना काळजी होती की, अनसूयेच्या पति भक्तीने ती स्वर्गातले ऐश्वर्य नक्कीच हिरावून घेईल. म्हणून सर्व देवगण चिंतेत पडले. शेवटी सर्वजण देवांचा राजा देवेंद्र म्हणजे इंद्राकडे तक्रार घेऊन गेले. तेव्हा इंद्राही बुचकळ्यात पडले. ते शेवटी ब्रह्मा, विष्णु व महेश यांच्याकडे गेले व त्यांनी सांगितले की, अत्रि ऋषींची भार्या हिची पतिभक्ती अपार आहे. व ती आपल्या पतिभक्तीच्या जोरावर आपल्या स्वर्गातील सुखसुद्धा हिरावून घेईल. कारण पतिव्रतेच्या शक्तीचा महिमा फार असतो. ती तन, मन, धनाने पतिसेवा करीत आहे. तशीच ती घरी आलेल्या अतिथीला विन्मुख कधीच पाठवित नाही. तिला अग्नी, सूर्य, वायु हे सुद्धा भितात.

पतिव्रतेचा शापदेखील खरा ठरतो. त्यामुळे सर्वजण तिला भितात. तरी यावर काही उपाय करावा. तेंव्हा हे सर्व ऐकल्यावर ब्रह्मा, विष्णु व महेश रागाने म्हणाले, ’ति महापतिव्रता सती कशी आहे याची आम्ही समक्ष जाऊन परिक्षाच पहातो’. आणि नंतर महासती अनसूया हिची परिक्षा पहाण्यासाठी ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांनी भिक्षुक वेश धारण केला व अत्रि ऋषींच्या आश्रमात भिक्षा ंमागण्यास आले.

सकाळची वेळ होती. अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी गंगेवर गेले होते. तेव्हा ही संधी साधून तिचे अतिथी अनसूयेस म्हणाले, आम्ही भुकेने व्याकूळ झालो आहोत. आम्हाला लवकर जेवण घाल. तू इच्छा भोजनही देतेस ही तुझी किर्ती ऐकून आम्ही येथे आलो आहोत; अतिथीचे हे भाषण ऐकून झाल्यावर अनसूयाने या त्रिमूर्तीला. आदराने नमस्कार केला व म्हणाली, आपण नित्यकर्मे आटोपुन यावीत; भोजन तयार आहे. तेव्हा तिघेही म्हणाले आम्ही स्नान करुनच आलोत. अत्रि ऋषींना येण्या उशीर होईल. तेव्हा प्रथम आम्हाला भोजन घालावे. अनसूयेने तिघा भिक्षुक रुपातील ब्रह्मा, विष्णु व महेश यांना पाटावर बसविले व जेवणाची पाने वाढून घेतली. तेव्हा भिक्षुक वेशांतील ब्रह्मा, विष्णू व महेश म्हणाले, आम्ही फार लांबून आलोत, तुझे हे अप्रतीम लावण्य पाहून आमची अशी इच्छा झाली आहे की, तू आम्हास वस्त्र फेडून जेवायला वाढावेस. जर तू असे न करता जेवावयास वाढशील तर आम्ही न जेवता जाऊ.

आता आली का पंचाइत; कारण, अनसूतेच्या घरुन आजपर्यंत तरी कोणताही अतिथी विन्मुख गेलेला नव्हता व आज हे जर न जेवता गेले तर आजपर्यंत मिळवलेले माझे सामर्थ्य नष्ट होईल व पतिव्रता नियमाचा भंग होईल. अनसूया आता मोठ्या विचारात पडली. तिने अतर्मनाने ओळखले की, माझी सत्त्वपरिक्षा पाहाण्यासाठी हे कोणी कारणिक पुरुष आले असावेत व अतिथी न जेवता जर गेले तर माझी तपहानी होईल. माझे मन निर्मळ आहे माझ्या पतीचे तपोबलही मोठे आहे व ते माझे या प्रसंगी अवश्य रक्षण करील. हा संकल्प अनसूयेने मनात केला व ती अतिथींना म्हणाली, तुम्ही स्वस्थ चित्ताने भोजन करा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला इच्छाभोजन वाढते.

….. नंतर स्वयंपाकघरात जाऊन अनसूयेने आपले वस्त्र फेडले व मनात म्हणली, ’अतिथी माझी बाळे आहेत.’ असे म्हणून ती बाहेर आली व काय चमत्कार झाला ! ते तिन्ही अतिथी लहान बाळे झाली व दुधासाठी रडू लागली. बालकांना पाहुन अनुसया भयभीत झाली व पुन्हा स्वयंपाक घरात जाऊन वस्त्र नेसून बाहेर आली व एकेका मुलाला मांडीवर घेऊन स्तन पान करु लागली. तिच्या स्तनपानाने तिन्हीही मुले संतुष्ट झाली.

ज्याचा पोटात प्रत्यक्ष १४ भुवने व ७ समुद्र व प्रत्यक्ष अग्नी नारायण आहे त्या ब्रह्मा, विष्णू व महेश यांची भुकही पतीव्रतेच्या अल्पशा स्तनपानाने भागली. इतके होईपर्यत दुपार झाली होती. अत्रिऋषी अनुष्ठान आटोपून आश्रमात परत आले. अनुसया मुलांचा पाळणा हालवीत गीत गात आहे हे पाहुन अत्रिऋषींना फार आचंबा वाटला. अनुसयेने घडलेली सर्व हकीकत पतीला सांगितली.

अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले की, हेच ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत व हे समजून त्यांनी त्या त्रिमूर्तीस नमन केले.

त्रिमुर्तीही प्रसन्न झाल्या व त्यांनी आपले खरे स्वरुप प्रकट केले व त्रिमुर्तिनी अनसूयेला सांगितले की, तुझी इच्छा असेल तो वर मागून घे, त्यावेळी महासती अनसूयेने असा वर मागितल की, आपल्या मुलाप्रमाणे ही तिन्ही बालके आपल्या आश्रमात राहावीत. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी ते मान्य केले व अनसूया त्यांचे पालन-पोषण करु लागली. ब्रह्मदेव चंद्र झाले. श्रीविष्णू दत्त झाले व महेश म्हणजे शंकर दुर्वास झाले.

काही कालानंतर ब्रह्मदेव व शंकर अनसूयेला विनवू लागले की, अम्हाला आमच्या स्वस्थानी तपानुष्ठाना साठी जावयचे आहे तरी आम्हास निरोप दे, तिसरा दत्त म्हणजे श्री विष्णु तुझ्या इच्छेप्रमाणे येथेच राहील आणि हाच त्रिमुर्ती अवतार समजा.

याप्रमाणे ब्रह्मा व शंकर तपानुष्ठानासाठी निघून गेल्यावर दत्तात्रेय मात्र अनसूयेच्या येथेच राहिला व हेच दत्तात्रेय होय.