वरुड येथे 7 ते 10 डिसेंबरदरम्यान कृषी विकास परिषद आमदार अनिल बोंडे यांची माहिती

0
789
Google search engine
Google search engine

अमरावती : कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, प्रयोग आपल्या परिसरातील शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने वरुड येथे कृषी विकास परिषद दि. 7 ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनिल बोंडे यांनी आज येथे दिली.
परिषदेच्या आयोजनानिमित्ताने आमदार श्री. बोंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, 2015 मध्ये वरुडला आयोजित कृषी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. परिसरातील शेतक-यांमध्ये जागृती वाढून गांडूळ खतनिर्मितीसारखे विविध प्रयोग शेतकरी करु लागले आहेत. ठाणाठुणी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प, वीज केंद्र, आदी बाबींनाही चालना मिळाली. त्यामुळे यंदा ही परिषद मोठ्या स्वरुपात आयोजित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुमारे अडीच लाख शेतकरी परिषदेला उपस्थित राहतील.
ते पुढे म्हणाले की, परिषदेत विविध संस्थांचे 250 स्टॉल असतील. सुवर्णकोंकण या संस्थेचे परिषदेला सहकार्य मिळाले आहे. प्रदर्शनात कुक्कुटपालन, अळिंबी लागवड, पशुपालन, फळबागा, फुलबागा, मसाला पीक, जलसंधारण, ठिबक सिंचन आदी विविध विषयांतील नवे प्रयोग, संशोधन यांची माहिती व मार्गदर्शन मिळेल. कीटकनाशकांचा वापर टाळून उत्पादकता टिकवत जैविक शेतीच्या प्रयोगांबाबतही या प्रदर्शनात माहिती मिळेल.
ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात शेतक-यांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षापर मार्गदर्शन सत्र स्वतंत्रपणे असेल. समाजप्रबोधनासाठी सत्यपाल महाराज यांचे प्रवचन, विदर्भातील लोककला खडी गंमत, दंडारचे प्रयोग यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन परिषदेत केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.