घामाच्या कामासाठी प्राणपणाला लावणार – डॉ. अजित नवले

0
680
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )

 

सह्याद्री अथीतीगृहावर ऊसदर प्रश्नी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाला रास्त उचल देण्यास नकार दिल्यामुळे ऊसदर प्रश्नी तोडगा काढण्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांनी गोळ्या झेळूनही घामाचे दाम मिळणार नसेल तर प्राणच पणाला लावावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे शेतकरी संघटना सुकाणू समिती चे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

या बैठकीत विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधीपक्ष नेते म्हणून शेतकऱ्यांची बाजू मांडण्याऐवजी कारखानदारांच्या अडचणींचा पाढा वाचला. ज्यांनी राज्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली त्या सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटलांच्याच पिढ्या शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांनी बाजू घेणार असतील व विरोधी पक्ष नेते सरकारच्या विरोधात उभे राहण्याऐवजी शेतकऱ्यांच्या विरोधात बाजू मांडणार असतील तर शेतकऱ्यांना वाली कोण ? असा प्रश्न या निमित्ताने बैठकीत उपस्थित करत शेतकरी संघटनाही आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सरकार आपली जबाबदारी पार पाडणार नसेल, विरोधीपक्ष नेते शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांनी बाजू घेणार असतील तर शेतकऱ्यांच्या पोरांना आता स्वतःच जीव पणाला लावण्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत यावेळी शेतकरी संघटनांच्या वतीने सहकार महर्षी विखे पाटलांच्या पुतळ्या चरणी आमरण उपोषण करत प्राण पणाला लावण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. न लाठी काठी चालवणार, ना जाळपोळ करणार, ना वाहतूक रोखणार या आंदोलनात ऊसदराचा अन्याय झालेले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अन्यायग्रस्त किसान पुत्र, शेतकरी व सहकार वाचविण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्रभरतील सर्व ऊस उत्पादकांना किमान 3500 रुपये समान उचल द्या, कारखाना निहाय वेगळ्या वेगळ्या  उचली जाहीर करून शेतकऱ्यांमध्ये फूट पडण्याचे व कमी उतारा असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे कारस्थान थांबवा. गंगामाई कारखाना आंदोलनातील शेतकरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या. कारखाना निहाय आंदोलने करायला लावून शेतकऱ्यांच्या पोरांना दरवर्षी रक्त सांडायला लावून केवळ बघ्याची भूमिका घेणे सरकारने थांबवा. दरवर्षी हंगामापूर्वी हस्तक्षेप करून सर्व कारखान्यांना एकच न्यायपूर्ण दर देण्यासाठी राज्याचा एकच किफायतशीर भाव जाहीर करा. ऊस वजनात चोरी रोखा या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणाच्या तयारीसाठी अहमदनगर येथे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील बाधित ऊस उत्पादकांची उपोषण तयारी बैठक घेण्यात येणार आहे. दिनांक 4 डिसेंबर रोजी सहकर महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी ता. राहता जिल्हा अहमदनगर येथील पुतळ्या समोर शेतकरी पुत्रांचे उपोषण सुरु होईल. डॉ.अजित नवले व शेतकरी संघटनांचे राज्यभरातील प्रमुख नेते स्वतः शेतकरी पुत्र म्हणून अन्न त्याग करून आमरण उपोषणाला बसतील. उपोषण राज्यव्यपी ऊसदर प्रश्नासाठी असेल. उपोषणाचे पावित्र राखण्याची क्षमता व तयारी असलेल्या किसान पुत्रानांच  केवळ उपोषणाला बसण्याची परवानगी असेल. कायदा हातात न घेत आत्मक्लेशच्या मार्गाने आंदोलन केले जाईल असा निर्णय यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी घेतला.

यावेळी डॉ.अजित नवले, बाळासाहेब पटारे, रोहिदास धुमाळ, अजयमहाराज बरस्कर, लालुशेठ दळवी, संतोष वाडेकर, अनिल देठे, बन्सी सातपुते, अशोक आरोटे, शांताराम वाळुंज, अरुण कान्हेरे, लहानु सदगिर, खंडू वाकचौरे, विकास वाकचौरे, युवराज जगताप, अनिल औताडे, रुपेंद्र काळे, शिवाजी जावरे, साईनाथ घोरपडे, लक्ष्मण नवले, सुभाष येवले आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. कारखानदारांच्या वतीने राधाकृष्ण विखे, सीताराम गायकर, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कुठे, शिवाजीराव नागवडे, अशोक देशमुख, बाळासाहेब ताजणे आदी हजर होते.

 

 

 

 

बैठकीत तणाव :–
बैठकीत शेतकरी आपली बाजू मांडत असताना विरोधीपक्ष नेते बैठक अर्ध्यावर सोडून निघाले असता डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांना “चला आपण पण बाहेर जाऊ या” असे म्हणत विखेना रोखले. तुमच्या अमंत्रणावरून आम्ही येथे आलो. तुमच्या जिकळयत गोळीबार झाला असताना त्या प्रश्नावर आता न्याय न होताच आपण उठून जाणार असाल तर आम्ही तरी कशाला थांबू असा सरळ सवाल केला. ज्या सहकार महर्षींनी सहकाराची मुहूर्त मेढ रोवली त्यांच्या पिढ्यानांच शेतकऱ्यांची अशी उपेक्षा करायची असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे असा सवाल केला. सारेच यावेळी भावुक झाले. विखेही भावुक होत खाली बसले व चर्चा पुढे सुरु झाली.