वॉटर कप स्पर्धेत 75 तालुक्यांतील गावांचा सहभाग -आमीर खान

0
1040
Google search engine
Google search engine

वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
जलयुक्त गावांना प्रोत्साहन द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा ही राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी पूरक आहे. जलयुक्त योजनेतील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच या स्पर्धेसाठी पाणी फाउंडेशनला सहकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

राज्य शासनाच्या सहकार्यामुळे वॉटर कप स्पर्धा यशस्वी झाली असून यंदा 75 तालुक्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे अभिनेता आमिर खान यांनी यावेळी सांगितले. अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्त राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस व अभिनेता आमीर खान यांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदाही वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील 24 जिल्ह्यातील 75 तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सरपंच व उपसरपंच यांना तसेच ग्रामस्थांना तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच या स्पर्धेमध्ये सीसीटी, शोष खड्डे आदी नरेगातील कामांचाही समावेश करण्यात यावा. या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होण्यासाठी प्रयत्न करावेत.

अभिनेते आमिर खान म्हणाले, गेल्या दोन वर्षात वॉटर कप स्पर्धेसाठी राज्य शासनाने व प्रशासनाने खूप मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली असून गावे पाणीदार होण्यास मदत झाली आहे. पहिल्या वर्षी तीन तालुके तर दुसऱ्या वर्षी 30 तालुक्याचा समावेश स्पर्धेत होता. यावेळी स्पर्धेत 75 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये स्पर्धेपूर्वीची गावे व स्पर्धेनंतरची गावे, यासंदर्भात प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याद्वारे लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
वॉटर कप स्पर्धेबरोबरच पाणीदार झालेल्या गावांमधील झुडपे वाढविणे, जंगलांचे संवर्धन, मृदा आरोग्य व जल व्यवस्थापन आदी चार महत्वाच्या विषयांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचेही श्री. खान यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. पोळ, श्री. ननावरे आदी यावेळी उपस्थित होते.