ब्राह्मण आणि हिदु परंपरा यांच्या अपकीर्तीचा प्रयत्न खपवून घेणार नाही !

0
770

पुणे – दशक्रिया चित्रपटामध्ये पुरोहितवर्ग, ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांवर यथेच्छ टीका केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जातीय द्वेष पसरवणार्‍या दशक्रिया या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे. याविषयी पोलीस आयुक्तांच्या नावे निवेदनही देण्यात आले. १७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

निवेदन देतांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सर्वश्री ऋषिकेश सुमंत, व्यंकटेश फडके, सागर मांडके, समर्थ फणसळकर, महेश खळतकर, भूषण जोगळेकर, सौ. माधवी शर्मा, अखिल ब्राह्मण पुरोहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भूषण काणे गुरुजी, मिलिंद आंबेटकर गुरुजी आदी उपस्थित होते. या संदर्भात महासंघाचे श्री. आनंद दवे म्हणाले, दशक्रिया चित्रपटाचे जे ट्रेलर प्रदर्शित झाले, त्या माध्यमातून ब्राह्मण समाज आणि हिंदु परंपरा यांची अपकीर्ती केल्याचे दिसून येते. वडीलधार्‍यांच्या निधनानंतर विधी करण्याची पद्धत सर्व धर्मांत आणि समाजांत आहे. कोणताही धर्मगुरु त्यासाठी कुणाला प्रोत्साहित करत नाही. तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मीय हे सॉफ्ट टार्गेट असल्याने चित्रपट निर्मात्यांचे तसे धैर्य होते. अशा जातीय द्वेषमूलक चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देऊ नये. केवळ हिंदूंच्या परंपरेवरच टीका करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. पुढील २ दिवसांत सदर चित्रपट प्रदर्शित करू नये; म्हणून चित्रपटगृह मालकांना निवेदन देणार आहोत. ट्रेलरमध्येच आक्षेपार्ह विधाने असतील, तर संपूर्ण चित्रपटातही असणार. यासाठी प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आम्हाला दाखवण्यात यावा. त्यात काही आक्षेपार्ह निदर्शनास आले, तर ती दृश्ये वगळावीत, ही आमची मागणी आहे.