राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे क्रीडामंत्र्यांचे आवाहन

0
1320
Google search engine
Google search engine

         ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत

मुंबई –

 

राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पात्र व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत,असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.

क्रीडामंत्री तावडे म्हणाले, राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू),उत्कृष्ट क्रीडा संघटक/कार्यकर्ता, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार इ. पुरस्कारांचा समावेश आहे.

 

हे पुरस्कार सन २०१४-१५, १५-१६ आणि १६-१७ या तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठीचा ऑनलाइन अर्ज www.mumbaidivsports.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदाराने ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची एक प्रत आवश्यक त्या स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह ५ डिसेंबर २०१७ पूर्वी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावी. सन २०१४-१५ या पुरस्कार वर्षासाठी ज्यांनी यापूर्वीच अर्ज सादर केले आहेत अशा उमेदवारांनी देखील नवीन शासन निर्णयाच्या नियमावलीनुसार नव्याने अर्ज सादर करावेत, असे देखील क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक किंवा किंवा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ३ लाख रुपये रोख, गौरवपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यात मदत झाली अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.यामध्ये महिला क्रीडा मार्गदर्शकास देण्यात येणारा पुरस्कार जिजामाता पुरस्कार म्हणून ओळखला जातो.१ लाख रुपये रोख, गौरवपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या संघटक आणि कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिकार क्षेत्रातील मुंबई, नाशिक,पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या आठ विभागातून प्रत्येकी १ असे आठ पुरस्कार दिले जातात.

या व्यतिरिक्त राज्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी व योगदान देणाऱ्या महिला कार्यकर्ती/संघटकास जिजामाता राज्य पुरस्कार देण्यात येतो. १ लाख रुपये रोख, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

        राज्य क्रीडा साहसी पुरस्कार

साहसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूस या पुरस्काराने गौरविण्यात येते. १ लाख रुपये रोख, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

        शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. गौरवपत्र, मानचिन्ह व १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. गौरवपत्र, मानचिन्ह व १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.