विमा योजनेत सहभागासाठी उरले थोडे दिवस… • 31 जुलै 2017 पर्यंत अंतिम मुदत

0
884
Google search engine
Google search engine

बुलडाणा-

 

खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यातील पिकांकरिता पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आता थोडेस दिवस उरले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 अंतिम मुदत आहे.
जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी याकरीता विमा हप्ता सीएससी मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.